जळगाव (प्रतिनिधी) – धक्कादायक बातमी समोर येत आहे . वीज मीटर नसताना वीज वापर केल्याने दंडाची रक्कम कमी करण्याच्या बदल्यात १ लाखांची लाच स्विकारताना जळगाव शहरात प्रशांत विकास जगताप या कंत्राटी वायरमनला एसीबी पथकाने अटक केल्याची घटना घडली आहे.
या प्रकरणी सविस्तर वृत्त असे आहे की, जळगाव शहरातील तक्रारदार यांचे घराचे बांधकाम पूर्ण झाले होते व त्यांनी घराला वीज मीटर बसवण्यासाठी काही दिवसांपूर्वी अर्ज केला होता. मात्र त्यांनी मीटर बसवले नव्हते. काही दिवसांपूर्वी त्यांच्या घराला महावितरण पथकाने भेट दिली असून त्यांनी ४ लाख ६० हजार रुपये दंडाची रक्कम भरली आणि वीज मीटर कनेक्शन मिळेल असा निरोप कंत्राटी वायरमन यांनी दिला होता. त्यानंतर तक्रारदार यांनी कंत्राटी वायरमन यांची भेट घेऊन त्यांच्याशी बोलणी केली व १ लाख ६० हजार रुपयांमध्ये प्रकरण मिटवतो असे सांगून लाचेची मागणी केली होती.
तक्रारदार यांनी दिलेल्या तक्रारीवरून चौकशी केली असता कंत्राटी वायरमन यांनी १ लाख ४० हजार रुपयांची मागणी करून पंचा समक्ष १ लाख रुपये स्वीकारताना रंगेहात पकडण्यात आले आहे. प्रशांत विकास जगताप (वय ३३) यांच्यावर जळगांव शहर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिस उप अधीक्षक सुहास देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक अमोल वालझाडे, सफौ दिनेशसिंग पाटील, पोना. सुनिल वानखेडे, पो.ना. बाळू मराठे, पोशी. राकेश दुसाने यांनी सापळा लावला. तर पोलीस निरीक्षक एन. एन. जाधव, स.फौ. सुरेश पाटील, पो. ह. रविंद्र घुगे, मपोहेकॉ शैला धनगर, पो. ना. किशोर महाजन, पो.कॉ. प्रदीप पोळ, पो. कॉ, पो. कॉ. प्रणेश ठाकुर, पोशी अमोल सूर्यवंशी, पोशी सचिन चाटे यांच्या पथकाने सहकार्य केले.