जळगाव (प्रतिनिधी) – मागच्या काही दिवसापूर्वी थंडीत अवकाळी पावसाने हजेरी लावली असून यामुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान झाले होते. या नुकसानीतून शेतकरी अजून सावरत नाही तोच महाराष्ट्रात पुन्हा अवकाळी पाऊस होण्याचा इशारा देण्यात आला आहे.
सूत्राने दिलेल्या माहितीनुसार, यादरम्यान आज ८ जानेवारी ला पाऊस होण्याची शक्यता आहे. 9 जानेवारी पावसाचा येलो अलर्ट हवामान खात्याकडून जारी करण्यात आला आहे. नैऋत्य अरबी समुद्रावरील सक्रिय कमी दाबाचे क्षेत्र आणि उत्तर कोकणातून उत्तरेकडे पसरलेल्या बाष्पाचे ढग तयार झाल्यामुळे हवामानावर परिणाम दिसून येत आहे. हवामान खात्याने वर्तविलेल्या अंदाजानुसार पुणे, कोल्हापूर, नाशिक, जळगाव, अहमदनगर भागात तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता आहे. तर 8 जानेवारीला धुळे आणि नंदुरबारमध्ये जोरदार पावसाची शक्यता असून हवामान विभागाकडून पावसाची येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.
सध्यातरी राज्यात दिवसभर ढगाळ वातावरण असून हवा असल्याने हवेत गारवा निर्माण झाला आहे. मागच्या दोन दिवसात राज्यातील विविध ठिकाणी पावसाने हजेरी लावली. यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान झाले.