उदापूर (ता. जुन्नर, जि. पुणे) – येथील घरुन दुचाकीवर कुटुंबाला घेऊन श्रीरामपूर येथे सासरवाडीला निघालेल्या दाम्पत्यामध्ये वाद झाला अन् पतीने रस्त्यातच मुलगा, पत्नीला विष पाजून पत्नीच्याच साडीने गळफास घेतला. विष पाजत असताना मुलीने पळ काढल्याने ती बचावली. या घटनेत पती-पत्नीसह मुलाचा मृत्यू झाला. वारणवाडी (ता. पारनेर) शिवारात शुक्रवारी दुपारी ही घटना घडली.
गजानन भाऊ रोकडे (वय ३५), त्यांची पत्नी पौर्णिमा (३४), मुलगा दुर्वेश (६), अशी मृतांची नावे आहेत. या घटनेतून ९ वर्षाची चैत्राली ही त्याची मुलगी घटनास्थळावरुन पळून गेल्याने बचावली असून तिच्यावर नगर येथील जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
मूळचे उदापूर येथील रोकडे हे सध्या रांजणगाव गणपती, (ता. शिरुर, जि. पुणे) येथे राहत होते. ते दोघेही तेथील एका पतसंस्थेत नोकरीस होते.