जळगाव (प्रतिनिधी) – गेल्या मे महिन्यात भारताचा अविभाज्य घटक असलेल्या मणिपूर राज्यात काही समाजकंटकांनी व जहाल विचारसरणीच्या लोकांनी एकत्रित येऊन दोन महिलांची नग्नावस्थेत धिंड काढली व त्यांचेवर पाशवी अत्याचार केले. या घटनेविरोधात येत्या २५ तारखेला मंगळवारी रोजी सकाळी १०:३० वाजता कोर्ट चौकातून हा मोर्चा निघणार असून जळगाव शहरातील महिला या घटनेचा तीव्र निषेध करण्यासाठी मोठ्या संख्येने उपस्थित राहून दोषींना त्वरीत शिक्षा व्हावी यासाठी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देणार आहेत.
देशविघातक प्रवृत्ती ही भारतीय लोकशाहीला लागलेली कीड आहे. या शक्ती जाणीवपूर्वक देशात विखारी वातावरण निर्माण करीत आहेत. समाजा-समाजा मध्ये घृणा निर्माण करुन तरुणांची माथी भडकावणे व त्यातून आपले हेतू साध्य करुन घेणे हाच त्या शक्तींचा मुख्य प्रयत्न आहे. त्या दुर्दैवी महिलांत तर एक देशासाठी कारगील युद्धात लढलेल्या वीर जवानाची पत्नी आहे. असे दुर्दैवी भाग्य त्यांच्या कपाळी लिहिणाऱ्या या विघातक शक्तीला आवर घालण्यासाठी त्या घटनेस जबाबदार असलेल्या समाजकंटकांना त्वरीत शिक्षा व्हावी, त्यांचेवरील खटला हा जलदगती न्यायालयात चालविण्यात यावा व त्यांना फाशीची शिक्षा मिळाली पाहिजे, अशी मागणी करत “अबला नही मैं सबला हू, जुल्म के खिलाफ झांशी की रानी हू” हे ब्रीद घेऊन २५ जुलैला सकाळी १०:३० वाजता निघणाऱ्या या मुक मोर्चात शहरातील सर्व महिलांनी सहभागी व्हावे असे आवाहन जळगाव शहराचे महापौर म्हणुन नव्हे तर एक महिला म्हणून शहरातील सर्वपक्षीय व सर्व धर्मीय संघटना तसेच सामाजिक संस्था व महिला यांना करीत आहे. तसेच या मूक मोर्चाला सर्व महिलांनी जास्तीत जास्त संख्येने सहभाग नोंदवावा व या घटनेचा निषेध करावा. अशी विनंती माजी महापौर सीमा भोळे, सरिता माळी(कोल्हे), शुभांगी बिऱ्हाडे, भारती काळे, भारती रंधे यांनी केले आहे.