जळगाव (प्रतिनिधी) – मेहरुण येथील श्री संत ज्ञानेश्वर प्राथमिक व माध्यमिक विद्यालयामध्ये गुरुपौर्णिमे निमित्त वृक्षपुजनाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी चिमुकल्या विद्यार्थ्यांनी शाळेच्या परिसरातील वृक्षांचे पूजन केले. वृक्ष रोपे लावून गुरुपौर्णिमा साजरी करण्यात आली.
सुरुवातीला महर्षी वेद व्यासमुनी यांच्या प्रतिमेचे पूजन मुख्याध्यापक मुकेश नाईक यांच्या हस्ते करण्यात आले. गुरुपौर्णिमेनिमित्त शाळेच्या परिसरात वृक्ष लावण्यात आले. मुख्याध्यापक मुकेश नाईक म्हणाले की, ज्या प्रमाणे आपण मार्गदर्शक व्यक्तीला किंवा एखाद्याला गुरु मानतो आणि त्यांची आपण श्रद्धेने पूजा-अर्चा करून गुरूंच्या सान्निध्यात राहण्याचा विचार करतो. त्याप्रमाणे जर आपण सर्वांनी वृक्षांना आपले गुरु मानले तर वृक्षाचा आदर निर्माण होऊन लोकांच्या मनात श्रध्दा प्रेमभाव वाढीस लागेल आणि वृक्षाचे संवर्धन व संगोपन होईल असे आवाहन शाळेतील विद्यार्थ्यांना मुख्याध्यापक मुकेश नाईक यांनी मार्गदर्शन करतांना केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शितल कोळी यांनी केले. यावेळी विद्यार्थ्यांचे पालक, परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमासाठी विद्यालयातील शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.