जळगाव (प्रतिनिधी) – बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेडराजा येथे समृद्धी महामार्गावर पहाटे खाजगी बसचा भीषण अपघात झाला आहे. यात २६ जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. ही घटना अत्यंत दुर्दैवी असल्याचं एकनाथ खडसे यांनी म्हटले आहे. या अपघातात मृत्यू झालेल्यांची कुटुंब उघड्यावर आली आहेत. या घटनेतील सर्व मृत मयत आत्म्यांना शांती लाभो अशी ईश्वर चरणी प्रार्थना करतो, असं सुद्धा एकनाथ खडसे यांनी म्हटले आहे.
समृद्धी महामार्ग हा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा ड्रीम प्रोजेक्ट आहे. मात्र या समृद्धी महामार्गावरील अपघातांच्या वाढत्या संख्येमुळे अनेक कुटुंब उद्ध्वस्त होत असून दुसरीकडे अनेकांचे स्वप्न भंग होत आहेत. आपल्या स्वप्नांची पूर्तता करण्यासाठी मात्र इतरांची स्वप्न उद्ध्वस्त करणे चुकीची बाब आहे, अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांनी केली.
समृद्धी महामार्ग हा प्रकल्प पूर्ण झाला तेव्हापासून या समृद्धी महामार्गावर सातत्याने मोठ्या प्रमाणावर अपघात होत आहेत. अपघातात मोठ्या संख्येने लोक मृत्युमुखी पावत आहेत. या ठिकाणच्या अपघाताची आकडेवारी पाहिली तर १०० दिवसात या समृद्धी महामार्गावर ९०० पेक्षा जास्त लहान-मोठे अपघात झाले आहेत. या अपघातामध्ये शेकडोच्या संख्येने लोक या ठिकाणी मृत्युमुखी पडले आहेत.एकीकडे समृद्धी महामार्ग हा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा ड्रीम प्रोजेक्ट आहे. दुसरीकडे मात्र या महामार्गावर झालेल्या अपघातात मृत्यू झालेल्या सर्वांची स्वप्न भंग झाली आहेत, असा चिमटा एकनाथ खडसे यांनी बोलताना उपमुख्यामंत्र्यांना काढला.