जळगाव (प्रतिनिधी) – जळगाव जिल्ह्यात अनेक हुशार विद्यार्थी आहेत. गुणवत्तेतही ते अग्रेसर आहेत. त्यांच्यातील सुप्त कौशल्यांचा परिपूर्ण विकास व्हावा हा उदात्त दृष्टीकोन समोर ठेऊन एसडी-सीडच्या अध्यक्षा रत्ना जैन आणि कार्याध्यक्षा मीनाक्षी जैन या नेहमीच प्रयत्नशीलअसतात. त्यांच्या मार्गदर्शनाखाली एसडी-सीड उपक्रमाची मागील पंधरा वर्षांपासून यशस्वीपणे वाटचाल सुरु आहे.
त्याचाच एक भाग म्हणून विद्यार्थ्यांना कृतीद्वारे विज्ञानाच्या संकल्पना शिकता याव्यात, हे उद्दिष्ट समोर ठेवून सुरेशदादा शैक्षणिक व उद्योजक विकास योजना जळगाव यांच्या तर्फे “ हँड्स ऑन सायन्स” या कार्यशाळेचे आयोजन कै. जी. एन. चांदसरकर माध्यमिक विद्यालय, जळगाव येथे करण्यात आले आहे. मार्गदर्शक म्हणून एसडी-सीड गव्हर्निंग बोर्ड सदस्य तसेच कुतूहल फाउंडेशनचे संचालक महेश गोरडे हे होते.
शाळेच्या विज्ञान पुस्तकातील फक्त शब्द वाचून व लिहून विज्ञान समजणे केवळ अशक्य आहे. बालवयात विद्यार्थ्यांना विज्ञान संकल्पना स्पष्ट न झाल्याने भविष्यातील वेगवेगळ्या प्रवेशपूर्व परीक्षांमध्ये त्यांना अपेक्षित यश प्राप्त होण्यास अडचणी निर्माण होतात. यावर उपाय म्हणजे बालपणापासूनच मुलांनी स्वानुभव आणि कृतीतून शिकणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन गोरडे यांनी या प्रसंगी केले.
तसेच मुलांमध्ये विज्ञानाची आवड निर्माण व्हावी आणि विद्यार्थ्यांचा विज्ञानाप्रती आत्मविश्वास वाढावा यासाठी त्यांच्याकडून काही प्रात्यक्षिक करवून घेतले. यात त्यांनी मुलांना विविध संकल्पनांवर आधारीत विज्ञान किट्स देऊन विविध मॉडेल बनवून घेतले व त्यामागील वैज्ञानिक संकल्पना समजावून सांगितल्या. यामुळे मुलांमधील विज्ञानाची भीती कमी होऊन विषय सोपा होण्यास नक्कीच मदत झाली.
कार्यक्रमाला मुख्याध्यापिका एस. पी.चौधरी, असोसिएट प्रवीण सोनवणे, वीरभूषण पाटील आर.डी. महाजन, मनीषा कानडे तसेच सर्व विद्यार्थी उपस्थित होते. हा उपक्रम यशस्वी होण्यासाठी कै. जी. एन. चांदसरकर विद्यालयाच्या मुख्याध्यापिका आणि विद्यालयाचे व्यवस्थापन यांच्या बद्दल एसडी-सीड गव्हर्निग बोर्ड चेअरमन डॉ. प्रसन्नकुमार रेदासनी यांनी कृतज्ञता व्यक्त केली आहे.