पैसा खरीदने के लिये भी पैसा लागता है..! तुम्ही हा डायलॉग कुठे तरी ऐकला असेल. आणि हा डायलॉग खरा देखील आहे.
नाणी बनवायला किंवा नोटा छापायला सरकारला देखील पैसे मोजावे लागतात. बाजारात येणाऱ्या कोऱ्या करकरीत नोटा बनवायला सरकारला देखील खर्च येतो.
दरवर्षी करोडो रुपयांच्या नोटा रिझर्व्ह बँकेकडून (RBI) बनवल्या जातात. रिझर्व्ह बँक (RBI) जरी नोटा बनवत असली तरी याचा सर्व खर्च केंद्र सरकार उचलत असते.
तर नोटा बनवायला सरकारला किती खर्च येत असेल हा प्रश्न अगदी सर्वानाचं पडत असेल तर याच विषयी आपण माहिती जाणून घेऊयात…
नोटा छापायला सरकारला किती खर्च येतो?
भारतामध्ये सध्या 10, 20, 50, 100, 200, 500, आणि 2000 रुपये किंमत असलेल्या नोटा अस्तित्वात आहे.
केंद्र सरकारने दिलेल्या माहितीनुसार प्रत्येक नोट बनविण्यासाठी लागणारा खर्च हा वेगवेगळा आहे. कोणती नोट बनवायला किती खर्च येतो?
2 हजार रुपयांची नोट छापण्यासाठी 2018-2019 मध्ये 3 रुपये 53 पैसे इतका खर्च लागत होता. सध्या 2 हजार रुपयांच्या नोटांची छपाई बंद आहे.
पाचशे (500) रुपयांची नोट छापण्यासाठी 2 रुपये 90 पैशे एवढा खर्च येतो.
दोनशे (200) रुपयांची नोट छापण्यासाठी 2 रुपये 37 पैशे एवढा खर्च येतो.
शंभर (100) रुपयांची नोट छापण्यासाठी 1 रुपये 77 पैशे एवढा खर्च येतो.
पन्नास (50) रुपयांची नोट छापण्यासाठी 1 रुपये 13 पैशे एवढा खर्च येतो.
वीस (20) रुपयांची नोट छापण्यासाठी 95 पैशे इतका खर्च येतो.
दहा (10) रुपयांची नोट छापण्यासाठी 96 पैशे इतका खर्च येतो.
भारतात सर्वप्रथम 1928 साली नाशिकमध्ये करन्सी नोट प्रेस [CNP] कंपनीमार्फत नोटाछपाईला सुरुवात झाली. देशात सध्या भारतीय रिझर्व्ह बँकेच्या (RBI) आधिपत्याखाली चार शासकीय नोटा छापण्याचे कारखाने आहेत. तसेच कर्नाटकातल्या मैसुरू येथे असलेल्या ‘भारतीय रिझर्व्ह बँक नोट मुद्रण प्रायव्हेट लि.’ या कंपनीमध्ये 2000 रुपयांच्या नोटांची छपाई चालू होती.