वरणगाव ता. भुसावळ (प्रतिनिधी) – गेल्या अनेक दिवसापासून ओझरखेडा येथे दूषित पाणीपुरवठा होत असल्याने नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. मात्र ग्रामस्थांनी अनेक वेळा ग्रामपंचायतीकडे तक्रार करूनही प्रशासन याकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे.
या गंभीर समस्येकडे ग्रामपंचायत दुर्लक्ष करत असल्याचा आरोप कैलास निकाळजे, संदीप ढगे बोल, रामा नेमाडे, येशू ढके, जालम पाटील यांच्या सह ग्रामस्थांनी केला आहे. दरम्यान, गेल्या महिन्यापासून ओझरखेडा गावात काही ग्रामस्थांनी दूषित पाणीपुरवठा होत असल्याची तक्रार ग्रामसेवक यांच्याकडे केली होती. मात्र, त्याकडे दुर्लक्ष करण्यात आले. शनिवारी सकाळी काही नागरिकांच्या नळाला दूषित पाणीपुरवठा झाल्याने ग्रामस्थांनी संताप व्यक्त केला.
गावात सरपंच राहत नसल्याने यावेळी ग्रामस्थांनी समस्यांचा पाढाच वाचला. त्यामुळे ही समस्या सांगायची कुणाला ? असा प्रश्न ग्रामस्थांना पडला आहे. ग्रामसेवकांना विचारले असता ते सरपंचांना विचारून सांगतो असे सांगतात त्यामुळे ओझरखेडा ग्रामस्थांकडून नाराजी व्यक्त केली जात आहे तर दूषित पाणीपुरवठ्यामुळे गावातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात येऊ शकते त्यामुळे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लक्ष द्यावे, अशी मागणी गावकऱ्यांनी केली आहे.