जळगाव (प्रतिनिधी) – प्लास्टिक प्रदूषण मुक्त जळगाव होण्यासाठी सर्व समाजात जनजागृती व्हावी आणि प्लास्टिक कचरा व्यवस्थापन पद्धतीबाबत सर्वांना माहिती मिळावी या उदेश्याने जमाआ त-ए-इस्लामी हिंद जळगाव महिला मंडळामार्फत आणि रेडक्रॉसच्या सहकार्याने सागरमित्र अभियान-कार्यशाळा रेडक्रॉस भवन येथे आयोजित करण्यात आली. यावेळी मुस्लीम समाजातील सर्व मुस्लीम समाजातील महिला भगिनी व विद्यार्थी उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला जमाते इस्लामी हिंद महाराष्ट्रचे आदिवासी विभाग प्रमुख सामी साहेब यांनी प्रार्थना सदर करीत इस्लामिक शिक्षणाबाबत माहिती दिली. प्रास्ताविक करताना निलोफर इकबाल यांनी भविष्यात प्लास्टिक कचरा व्यवस्थापन उपक्रमाची गरज व आपण उचलावयाचे पाऊल याबाबत माहिती दिली. जमाते इस्लामी हिंद महाराष्ट्र राज्य सल्लागार समिती सदस्य आमीर सोहैल यांनी प्लास्टिकच्या चुकीच्या वापरामुळे मानवी जीवनाच्या होणाऱ्या नुकसानीबाबत माहिती दिली. रेडक्रॉसचे उपाध्यक्ष गनी मेमन यांनी महिला सक्षमीकरणाबाबतचे उपक्रम राबविण्याबाबत आवाहन केले.
सागरमित्र अभियानाचे जिल्हा समन्वयक विशाल सोनकुळ यांनी माहिती देताना सांगितले कि,प्लास्टिक प्रदूषण ही आज एक मोठी पर्यावरणीय समस्या आहे. तज्ञांच्या अंदाजानुसार 2050 पर्यंत समुद्रातील प्लास्टिकचे वजन सर्व माशांपेक्षा जास्त असेल. प्लास्टिक प्रदूषणाचा थेट आणि घातक परिणाम वन्यजीवांवर होतो. दरवर्षी, हजारो समुद्री पक्षी आणि समुद्री कासव, सील आणि इतर सागरी जीव प्लास्टिक खाल्ल्यानंतर किंवा अडकल्यानंतर मरतात. ज्यासाठी तातडीने उपाययोजना करणे आवश्यक आहे.
प्लास्टिक प्रदूषणाचे पर्यावरणावर होणारे परिणाम दूरगामी आहेत. या समस्येचे निराकरण करण्यासाठी, आपण आपला प्लास्टिकचा वापर कमी केला पाहिजे आणि कचरा व्यवस्थापन पद्धती सुधारल्या पाहिजेत. सर्वांनी घरात वापरत असणाऱ्या प्लास्टिक कचरा संकलित करून पुनर्वापर करण्यासाठी द्यावा असे आवाहन ही त्यांनी केले.
या प्रसंगी रेडक्रॉस चेअरमन विनोद बियाणी,जनसंपर्क अधिकारी उज्वला वर्मा व महिला मंडळ पदाधिकारी उपस्थित होते. याप्रसंगी उपस्थित सर्व महिला भगिनींना हायजेनिक किट्स भेट देण्यात आले.