जळगाव (प्रतिनिधी) – लहानपणापासून मुलांनी दातांची काळजी घ्यावी. मुलांनी दिवसातून दोन वेळा ब्रश करावा. ही सवय स्वतःला लावली तर भविष्यात अनेक आजारांपासून दूर ठेवता येते. लहान मुलांनी दररोज दूध घ्यावे. त्यामुळे कॅल्शियममध्ये वाढ होते अशी माहिती दंतरोगतज्ज्ञ डॉ. हेमंत पाटील यांनी दिली.
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या दंत शल्यचिकित्सा विभागातर्फे जागतिक मौखिक आरोग्य दिनानिमित्त जळगावच्या बालसुधारगृहात तेथील मुलामुलींची दंत तपासणी करण्यात आली. यावेळी बालसुधारगृहाच्या अधीक्षका जयश्री पाटील आणि अधीक्षक रविकिरण अहिरराव यांच्यासह दंत शल्यचिकित्सा विभागप्रमुख डॉ. हेमंत पाटील, यांच्यासह डॉ. सुयश जोशी प्रामुख्याने उपस्थित होते.
यावेळी प्रत्येक मुलामुलींची दंततपासणी करण्यात आली. मुलांना दातांचे आरोग्य कसे राखावे, रोज ब्रश कसे करावे याबाबत माहिती दिली. मोठे झाल्यावर व्यसनांपासून लांब राहा. दातांना कॅल्शियमची अधिक गरज असते. हे कॅल्शियम मिळण्यासाठी रोज दूध पिले पाहिजे. यामुळे दातांच्या आरोग्यात वाढ होते. असे यावेळी डॉ. हेमंत पाटील व डॉ. सुयश जोशी यांनी सांगितले. डॉ. करिष्मा सरोदे, डॉ. सतीश सुरळकर, तंत्रज्ञ सूर्यकांत विसावे, क्षितीज पवार यांनीही दंततपासणी केली. कार्यक्रमासाठी अधिष्ठाता डॉ. गिरीश ठाकूर, वैद्यकीय अधीक्षक डॉ. विजय गायकवाड यांचे मार्गदर्शन लाभले.