मुंबई (प्रतिनिधी) – दहावी, बारावीच्या परीक्षेला शिक्षणातील महत्वाचा घटक मानला जातो. या परीक्षांच्या निकालावर पुढच्या आयुष्याची दिशा ठरते, . आजपासून बारावीच्या बोर्डाच्या परीक्षेला प्रारंभ होत आहे. सर्व विद्यार्थी त्यासाठी तत्पर झाले आहेत. कसून तयारी आणि मेहनत , रिव्हिजन सगळं करून आता विद्यार्थी पेपर देण्यासाठी तयार आहेत. मात्र याच पार्श्वभूमीवर दहावी बारावी बोर्ड परीक्षा संदर्भात येणाऱ्या चुकीच्या बातम्या आणि अफवांवर विश्वास ठेवू नका, अशी विनंती शिक्षण मंडळाकडून विद्यार्थी पालकांना करण्यात आली आहे.महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या पुणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर व कोकण या नऊ विभागीय मंडळांमार्फत फेब्रुवारी-मार्च २०२४ मध्ये घेण्यात येणारी उच्च माध्यमिक प्रमाणपत्र बारावी बोर्डची लेखी परीक्षा आज, अर्थात २१ फेब्रुवारी पासून सुरू होत असून १९ मार्च २०२४ पर्यंत होणार आहे. तसेच माहिती तंत्रज्ञान, सामान्यज्ञान या विषयांची ऑनलाईन परीक्षा दिनांक २० ते २३ मार्च २०२४ या कालावधीत आयोजित करण्यात आली आहे. तर इयत्ता १० वीची, माध्यमिक शालान्त प्रमाणपत्रची लेखी परीक्षा दिनांक १ मार्च २०२४ ते २६ मार्च २०२४ या कालावधीत आयोजित करण्यात आली आहे.
मात्र १२ वी व १० वी च्या परीक्षे दरम्यान विविध माध्यमांद्वारे तसेच सोशल मिडीयावर परीक्षेच्या अनुषंगाने अफवा प्रसारित केल्या जाण्याची शक्यता टाळता येण्यासारखी नाही. यामुळे विद्यार्थी व पालकांमध्ये गोंधळ निर्माण होत आहे , चिंता वाढते आहे . त्यामुळे अशा कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये असे आवाहन विद्यार्थी व पालकांना करण्यात आले आहे. तसेच अशा अफवा किंवा विद्यार्थी व पालकांची दिशाभूल केल्या जाणाऱ्या बातम्या पसरवणाऱ्यांच्या विरोधात मंडळामार्फत कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
अनुचित कार्य थांबविण्यासाठी भरारी पथक तत्पर