बुलढाणा (प्रतिनिधी) – माजी मुख्यमंत्री, शिवसेनेच्या उबाठा गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज बुलढाणा येथे भाजपावर जोरदार टीका केली. गद्दारांना हमीभाव आहे, परंतू माझ्या शेतकऱ्यांना हमी भाव मिळत नाही. जिल्ह्यातील 550 गावात अद्यापही रोजगार हमी योजनेची कामे सुरु झालेली नाहीत. पंतप्रधानांच्या किती योजनांचा फायदा झाला असा प्रश्न उद्धव ठाकरे यांनी केला आहे. मोदी भाजपाचे पंतप्रधान म्हणून भाषणे करत आहेत. त्यांनी देशाचे पंतप्रधान म्हणून भाषण करावे असा टोला ठाकरे यांनी मारला आहे.
देशात जीवाला जीव लावणारी माणसे राहीली नाहीत. मी तुमच्या प्रेमाचा भुकेला आहे. तुम्हाला भेटल्यानंतर कुटुंबाला भेटल्याचा आनंद मला मिळतो तसेच जनसंवाद होतो. त्या गद्दारांना त्यांचे 50 खोके लाभो. चिन्ह, पक्ष चोरला, कपाळावरचं भाग्य व शिक्का तर कोणी चोरू शकत नसल्याचे उद्धव ठाकरे यांनी यावेळी म्हटले
उद्धव ठाकरे पुढे म्हणाले की हो मी कॉंग्रेस सोबत गेलो. कारण भाजपाने वचनाचा भंग केला. मी माझ्यासाठी नव्हे शिवसेनेसाठी मुख्यमंत्री द्या म्हटले होते. अडीच-अडीच वर्षे ठरले होते. शब्द तुम्ही मोडला. मी कोणालाही फसविले नाही. लुबाडले नाही. आयुष्यात कधीही खोटे बोलले नाही. मोदीजी तुम्हाला वाजपेयी कचऱ्यात टाकणार होते. मात्र बाळासाहेबांनी वाचविले असेही ठाकरे यावेळी म्हणाले. गुजरातला तु्म्ही जरुर समृद्ध करा. परंतू महाराष्ट्राला खच्चीकरण करु नका, असे कराल तर भाजपाच्या पोटात शिवसैनिक लाथा घालतील अशी टीका त्यांनी यावेळी केली.
ईडी, सीबीआय भाजपाचे घरगडी म्हणून काम करत आहेत. परंतू आमचं सरकार आल्यावर आम्ही पाहून घेऊ काय करायचे ते असा इशारा ठाकरे यांनी आपल्या भाषणात दिला. भाजपा आणि आरएसएसच्या कार्यकर्त्यांना एकच सांगतो, की तुमची मेहनत कुठे गेली, कारण त्यांनीच नेमणूक केलेल्या लोकांना उमेदवारी मिळणार असल्याचे ते बोलले . शिवसेना गद्दारांना पाठीशी घालत नाही आणि आजपासून निवडणूक आयोगाचे नवीन नाव धोंड्या अशा शब्दात उद्धव ठाकरे यांनी सरकारी यंत्रणा आणि त्यांचा गैरवापर करणाऱ्या भाजपा सरकारला टोला मारला .