जळगाव (प्रतिनिधी) – नगरदेवळा येथील शहीद जवान भैय्यासाहेब रोहिदास बागुल यांचे वारस म्हणून त्यांची आई तुळसाबाई बागुल यांना महसूल विभागाने पाचोरा तालुक्यातील वाघुलखेडा येथे शासकीय जमीन उपलब्ध करून दिली आहे. प्रजासत्ताक दिनी पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते त्यांना जमिनींचा सातबारा वाटप करण्यात आला. तब्बल दहा वर्षांच्या पाठपुराव्यानंतर जमीन मिळाल्याने वीरमाता व कुटुंबीयांनी महसूल प्रशासनाप्रती कृतज्ञतेचे भावना व्यक्त केल्या.
भैय्यासाहेब रोहिदास बागुल हे ३० मार्च २००० रोजी ऑपरेशन रक्षक मोहीमेत शहीद झाले होते. शासननिर्णयानुसार शहीद जवानांच्या वारसांने शासकीय जमीनीची शेती कसण्यासाठी मागणी केल्यास अर्जदार वारसाच्या नावे शेतजमीन नसल्याची खात्री करून उपलब्ध शासकीय जमीन दिली जाते. अर्जदार वीरमाता तुळसाबाई यांना पाचोरा तालुक्यातील वाघुलखेडा येथील गट नंबर १४ मध्ये १ हेक्टर ६० आर जमीनी उपलब्ध करून देण्यात आली आहे. याबाबतचा जमीन हस्तांतरण आदेश जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी २५ जानेवारी रोजी जारी केला होता. या आदेशानुसार पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते त्यांना प्रजासत्ताक दिनी जमीनीचा सातबारा प्रमाणपत्र वाटप करण्यात आले.
“गेल्या दहा वर्षांपासून शासकीय जमीन मिळण्यासाठी पाठपुरावा करत होतो. आज जमीनीचा सातबारा मिळाल्याने भावना अनावर झाल्या. जिल्हा प्रशासनाने सकारात्मक भूमिका ठेवत शासकीय जमीन मिळवून दिली.”अशी प्रतिक्रिया तुळसाबाई यांनी दिली आहे
याप्रसंगी जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, मुख्य कार्यकारी अधिकारी अंकित, निवासी उपजिल्हाधिकारी सोपान कासार, जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी तसेच इतर अधिकारी – कर्मचारी उपस्थित होते.