जळगाव (प्रतिनिधी) – अमळनेर नगरपालिकेच्या माध्यमातून शहराचा विकास करण्यास वाव आहे. नगरपालिकेने स्वच्छता, घरकुल व कर वसूली मध्ये झोकून देऊन काम करून अपेक्षित रिझल्ट द्यावा.अशा सूचना जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी आज येथे दिल्या.
अमळनेर नगरपालिकेच्या विविध कामकाजाचा जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्या अध्यक्षतेखाली आज आढावा घेण्यात आला त्यावेळी ते बोलत होते. यावेळी अमळनेर प्रांताधिकारी महादेव खेडकर, प्रांताधिकारी महादेव खेडकर, नगरपालिका मुख्याधिकारी प्रशांत सरोदे, तहसीलदार रूपेशकुमार सुराणा, गटविकास अधिकारी सुशांत पाटील, उप मुख्याधिकारी संदीप गायकवाड आदी अधिकारी – कर्मचारी उपस्थित होते.
जिल्हाधिकारी आयुष प्रसाद म्हणाले की, अमळनेर स्वच्छ व सुंदर करण्यास प्राधान्य द्यावे. शहराच्या विकासासाठी काम करण्यास चांगला वाव आहे. स्वच्छतेसाठी घंटागाडीचा मार्ग ठरवून देण्यात यावा. आठवड्यातून तीन दिवस मुख्याधिकाऱ्यांनी स्वतः शहराची चकर मारावी. घंटागाडीसाठी हेल्पलाईन क्रमांक जाहीर करण्यात यावा. खासगी मालमत्तेवर कचरा टाकण्यात येत असल्यास दंडात्मक कारवाई करण्यात यावी. माझी वंसुधरा व स्वच्छ शहर हे दोन्ही अभियान एकत्र राबविण्यात यावे. या अभियान स्पर्धेत अमळनेर नगरपालिकेच्या यावर्षी रॅंक मध्ये सुधारणा झाली पाहिजे.
स्वच्छता मोहिमेत स्थानिक लोकप्रतिनिधी, सोसायटीचे नागरिक, स्वयंसेवी संस्था व स्थानिक नागरिकांचा लोक सहभाग वाढविण्यात यावा. समाजातील सर्व घटकांना सहभागी करून घ्यावे गावागावी स्वच्छता मोहीम राबविली पाहिजे. शहर धुळमुक्त होण्यासाठी उपाययोजना राबविण्यात याव्यात. अशा सूचनाही त्यांनी दिल्या.
नगरपालिका मुख्याधिकारी व कर्मचाऱ्यांनी बारामती व खोपोली नगरपालिकेचा अभ्यास दौरा करावा. ३१ ऑक्टओंबर पर्यंत साडेबारा कोटींची थकीत करवसूली शंभर टक्के झाली पाहिजे. कॅशलेस वसूली वर भर दिला पाहिजे. यासाठी नोटीसा देण्यात याव्यात. आपल्या स्तरावर लोक अदालत आयोजित करून तक्रारींची निपटारा करण्यात यावा. ३१ डिसेंबर पर्यंत जिल्हा नियोजनाची मंजूर व घरकुलाची कामे पूर्ण झाली पाहिजेत. एकाच वेळेस एका ठेकेदाराला काम देऊ नका. सर्व सामान्य जनतेशी संवाद ठेवण्यात यावा. शहरातील पाण्याच्या पातळीत वाढ करण्यासाठी जलपूर्नरभरण व रेन वॉटर हार्वेस्टिंगची कामे करण्यात यावीत.अशा सूचना जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी यावेळी दिल्या.