जळगाव (प्रतिनिधी) – आपण नेहमी पानामधून गुलकंद खात असतो. पण तुम्ही याचे नियमित सेवन केले तर तुम्हाला नक्कीच याचा फायदा मिळतो. शरीराला याचे काय महत्त्वाचे फायदे होतात हे आम्ही तुम्हाला सांगत आहोत. विशिष्ट आजारांवर गुलकंदाचा चांगला प्रभाव दिसून येतो. त्यामुळे तुम्ही याचा समावेश तुमच्या दैनंदिन आयुष्यात नक्कीच करून घ्यायला हवा.
वजन कमी करण्यासाठी
गुलकंदातील औषधीय गुणांमुळे वजन कमी करण्यासाठी याचा उपयोग होतो. तुम्ही याचे सेवन करून वजन नियंत्रणात ठेऊ शकता. गुलकंद तयार करण्यासाठी ज्या गुलाबांच्या पाकळ्यांचा उपयोग केला जातो, त्यामध्ये अजिबात फॅट नसते. त्यामुळे लो – फॅट खाद्यापदार्थांच्या सेवनामध्ये वजन कमी करण्यासाठी गुलकंदाचा उपयोग केला जातो. यावर अजूनही शोध चालू आहे. मात्र अतिप्रमाणात याचे सेवन करू नये. तुम्ही रोज तुमच्या नाश्त्यामध्ये एक चमचा गुलकंदाचा समावेश करून घ्यावा.
तोंडाला आत पुळ्या आल्यास
जर तुम्हाला तोंड आलं असेल आणि त्यामुळे काहीही खाणं जमत नसेल तर अशावेळी गुलकंद आवर्जून खा. गुलकंद खाल्ल्याने पोटाला थंडावा मिळतो आणि तोंडात आलेली उष्णताही कमी होते. तोंड आल्यानंतर तुम्हाला काहीही खाणे शक्य होतन नाही आणि तोंडाची जळजळही होते. गुलकंदामध्ये विटामिन बी चे प्रमाण अधिक असते. एका शोधानुसार, विटामिन बी कॉम्प्लेक्सची कमतरता असल्यास, तोंड येण्याची समस्या सुरू होते. त्यामुळे यावर उत्तम उपाय म्हणजे गुलकंद खाणे. विटामिन बी कॉम्प्लेक्सच्या कमतरतेशिवाय यातील थंडाव्यामुळेही शरीरातील उष्णता कमी होऊन उपाय लागू पडतो.
डोळ्याच्या थंडाव्याकरिता
सतत काम करून डोळ्यांची जळजळ होणे, डोळ्यांवर उष्णता निर्माण होणे असे अनेक त्रास आपल्याला होत असतात. यावर डोळे न चोळता तुम्ही गार पाण्याने धुणे आणि गुलकंद खाणे हे उत्तम उपाय आहेत. डोळ्यांखाली येत असणारी सूज आणि डोळे लाल होण्याची समस्या असेल तर ही तुमच्या शरीरातील अति उष्णतेमुळे निर्माण होणारी समस्या आहे. त्यामुळे यावर तुम्ही गुलकंदाचा उपाय नक्कीच करून पाहू शकता. रोज तुम्ही एक लहान चमचा गुलकंदाचे सेवन केल्यास, शरीरामध्ये थंडावा निर्माण होऊन डोळ्यांच्या उष्णतेची ही समस्या दूर होण्यास मदत मिळते.
पोटात गॅस निर्माण झाल्यास
तुम्हाला सतत अॅसिडीटी आणि गॅससारख्या समस्या असतील तर गुलकंद खाण्याचे फायदे मिळतात. गुलकंद हे गुलाबाच्या पाकळ्यापासून बनवले जाते हे सर्वांनाच माहीत आहे, ज्या अत्यंत गुणकारी असतात. असे म्हटले जाते की, गुलाबाचा वापर हा पचनतंत्रासाठी अत्यंत उपयुक्त ठरतो. पचनतंत्र सुधारण्यासाठी आणि बद्धकोष्ठतेची समस्या नीट करण्यासाठीही याचा उपयोग होतो. बद्धकोष्ठतेमुळेच गॅसची समस्या निर्माण होते. अन्नाचे अपचन हे गॅस होण्याचे मुख्य कारण आहे. पण गुलकंद खाण्याने या समस्येतून तात्पुरती सुटका नक्कीच मिळते.