जळगाव (प्रतिनिधी) – आगामी लोकसभा निवडणुकीच्या तयारीसाठी भाजपकडून मोर्चे बांधणीला वेग आला असून केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हे ५ मार्च रोजी महाराष्ट्राच्या दौऱ्यावर येत आहेत १५ फेब्रुवारी रोजी अमित शाह हे दौऱ्यावर येणार होते. मात्र, हा दौरा स्थगित करण्यात आला होता. आता ५ मार्च रोजी अकोला, जळगाव व छत्रपती संभाजीनगर येथे अमित शाह यांच्या सभा होणार आहे.
जळगाव शहरातील सागर पार्क मैदानावर दुपारी एक वाजता अमित शहा यांच्या उपस्थितीत युवा संमेलनाचे आयोजन करण्यात आल्याची माहिती भाजपकडून देण्यात आली आहे खासदार उन्मेश पाटील यांनी देखील अमित शहा यांच्या ५ मार्च रोजी होणाऱ्या दौऱ्याचा दुजोरा दिला आहे. भाजपकडून आगामी लोकसभा निवडणुकीसाठी ‘क्लस्टर’ ही संकल्पना राबवली आहे.
एका क्लस्टर मध्ये ४ लोकसभा मतदारसंघाचा समावेश करण्यात आला आहे. जळगाव क्लस्टर मध्ये जळगाव, रावेर, धुळे व नंदुरबार या ४ लोकसभा मतदारसंघाचा समावेश करण्यात आला आहे. या क्लस्टर अंतर्गत जळगावला दी. ५ रोजी अमित शाहा हे भाजप पदाधिकारी, कार्यकर्त्यांसह युवकांसोबत संवाद साधणार आहे. तसेच काही लोकांचा अमित शाह यांच्या उपस्थितीत भाजपात प्रवेश देखील होणार आहे.