जळगाव (प्रतिनिधी) – जळगावातील स्थानिक गुन्हे शाखेचे निलंबित पोलीस निरीक्षक किरणकुमार बकाले हे गेल्या दीड वर्षापासून फरार होते. अखेर आज सोमवार दिनांक १५ जानेवारी रोजी सकाळी पोलीस अधिक्षक कार्यालयात स्वतःहून शरण आले आहे. यामुळे पोलीस विभागात एकच खळबळ उडाली आहे.
मराठा समाजाबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केल्याप्रकरणी विनोद देशमुख फिर्यादीवरून जिल्हा पेठ पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यांचे निलंबन करून नाशिक येथे हजर राहण्याचे आदेश देण्यात आले होते. परंतू ते हजर न होता फरार झाले होते. त्यांनी अटकपूर्व जामीनासाठी स्थानिक न्यायालयासह उच्च न्यायालयात अर्ज केला होता. मात्र न्यायालयाकडून त्यांचा अटकपूर्व जामीन फेटाळून लावला होता. त्यामुळे बकाले यांच्या पदरी निराशा पडली होती. यातच पोलीस प्रशासनाने त्यांची मालमत्ता जप्त करण्याबाबत न्यायालयात अर्ज केला होता. अडचणीत वाढ होत असल्याने अखेर किरणकुमार बकाले यांनी सोमवारी १५ जानेवारी रोजी सकाळी पोलीस अधिक्षक कार्यालयात येवून हजर झाले व त्यांची ११ वाजेच्या दरम्यान मेडिकल चेकअप करण्यात आले. सहाय्यक पोलीस अधिक्षक संदीप गावीत यांच्याकडे बकाले यांना हजर करण्यात आले असून त्यांची कसून चौकशी केली जात आहे.