चाळीसगाव (प्रतिनिधी) – चाळीसगाव विधानसभा निवडणुकीचे सध्या सर्वत्र रणधुमाळी सुरू असून राजकीय आरोप प्रत्यारोप होत असताना चाळीसगाव मध्ये एक अनोखाच प्रकार समोर आला आहे. राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते रोहित पवार हे चाळीसगाव येथे सभेसाठी आले असता ते चक्क भाजपा उमेदवार मंगेश चव्हाण यांचा प्रचार करत होते की काय असा प्रश्न निर्माण झाला आहे ? त्याचं कारण ही तसेच आहे, चाळीसगाव मध्ये रोहित पवार यांची सभा आयोजित केली होती मात्र सभेमधला एक फोटो सध्या सोशल माध्यमांमध्ये चांगलाच व्हायरल होत आहे.
त्यामध्ये चाळीसगाव चे भाजपचे आमदार मंगेश चव्हाण यांच्या विकास कामांचे माहिती असणारे पत्रक रोहित पवार हे बारकाईने वाचत असल्याचे दिसून येत आहे. यावरून रोहित पवार नेमके कोणाच्या प्रचाराला चाळीसगावला आले होते याबाबत आता मतदारसंघात उलट सुलट चर्चा सुरू झाल्या आहेत.
याबाबत एका जबाबदार कार्यकर्त्याला विचारले असता त्यांनीच सांगितले की, रोहित पवार चाळीसगाव मध्ये आल्यानंतर त्यांना अनेक विकास कामे व शहरात झालेल्या बदल दिसून आला त्यामुळे ते प्रभावित होऊन नेमके कोणते विकास कामे आमदार मंगेश चव्हाण यांनी मतदारसंघात केली आहे याची माहिती त्यांनी जाणून घेतली व मंगेश चव्हाण यांच्या विकास कामांचे माहिती पत्रक देखील सोबत नेल्याचे समजते.
मात्र हे सर्व व्यासपीठावरच ते वाचत असल्याने राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी त्याचे फोटो सोशल माध्यमातून व्हायरल करून आपल्या नेत्याच्या या भूमिकेबद्दल प्रश्नचिन्ह निर्माण केले आहे,, याबद्दल तालुक्यातून उलटसुलट चर्चा सुरू असून राष्ट्रवादीचा छुपा पाठिंबा भाजपाला तर नाही ना? असे प्रश्न या निमित्ताने उपस्थित होत आहे. कारण सभा संपल्यानंतर पत्रकारांशी बोलताना आमदार मंगेश चव्हाण हे हुशार नेते आहेत असेही एका प्रश्नाचे उत्तर देताना सांगायला रोहित पवार विसरले नाहीत.