रावेर (प्रतिनिधी) – रावेर यावल विधानसभा मतदारसंघ निवडणूक २०२४ भारतीय राष्ट्रीय काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार, आणि शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) महाविकास आघाडीचा अधिकृत उमेदवार धनंजय चौधरी यांनी यावल तालुक्यातील दुसखेडा, कठोरा, कासवा, अकलूद येथील ग्रामस्थांशी संवाद साधला.
सकाळी गुलाबवाडी येथून सुरु झालेली प्रचारफेरी मोरव्हाल, विश्राम जिन्सी, जिन्सी, आभोडा खु., आभोडा बु., रमजीपूर, बक्षीपूर, खिरोदा प्र.रावेर, रसलपूर आदी भागातून काढण्यात आली. यावेळी ठिकठिकाणी ग्रामस्थांशी संवाद साधतांना धनंजय चौधरी यांनी तुम्हा सर्वांच्या आशिर्वादाने काँग्रेस पक्ष महाविकास आघाडीचा अधिकृत उमेदवार म्हणून ही निवडणूक लढवत असून, मतदारसंघातील शेतकरी, कष्टकरी, महिला, आणि युवकांचे प्रश्न विधिमंडळात मांडून त्यांची सोडवणूक करण्यासाठी, तसेच रावेर यावल विधानसभा मतदारसंघाचा शाश्वत विकास करण्यासाठी, माझ्या ‘हाताचा पंजा’ या चिन्हासमोरील बटण दाबून मतदानरूपी आशीर्वाद देण्याची विनंती केली.
आमदार शिरीष चौधरी यांच्या माध्यमातून अकलुद फाटा ते दुसखेडा पेपरमिल रस्ता डांबरीकरण, अकलुद ते आमोदा रस्ता डांबरीकरण तसेच कासवा येथे संत गंजानन महाराज मंदिराजवळ सभामंडप बांधकाम व गावातंर्गत काँक्रीटीकरण अशी विविध विकास कामे झालेली आहेत. अडीच वर्षे महायुती सरकारने कामे थांबविल्यामुळे निश्चितच काही कामे राहुन गेलेली आहेत, ती पूर्ण करण्यासह परिसराचा विकासाचा अनुशेष पूर्ण करेल, असा विश्वास त्यांनी यावेळी गावकऱ्यांना दिला. प्रचार फेरीत त्यांच्यासमवेत महाविकास आघाडीचे पदाधिकारी कार्यकर्ते व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.