धरणगाव (प्रतिनिधी) – पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा पालकमंत्री गुलाबराव पाटील व माजी जिल्हा परिषद सदस्य प्रतापराव पाटील यांच्यातर्फे दरवर्षी आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या कुटुंबियांना बैलपोळ्यानिमित्त सजविण्यासाठी साज वाटप करण्यात येतो. यंदा देखील धरणगाव तालुक्यातील सहा व जळगाव तालुक्यातील 11 गावातील आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांना बैलांसाठी साज वाटप केला. तर ज्या शेतकऱ्यांकडे बैल जोडी नाही त्या शेतकऱ्यांना महिनाभरचा किराणा वाटप करण्यात आला आहे.
बैलांप्रती कृतज्ञता व्यक्त करणारा हा सण आहे. कृषीप्रधान या देशात या सणाला विशेष महत्व आहे. शेतकरी या दिवसाची आतुरतेने वाट पाहत असतो. शेतकर्याचा सखा, मित्र सर्जा- राजाचा आजचा दिवस मानाचा असतो. पण, ज्या शेतकऱ्यांनी आत्महत्या केली आहे अशा कुटुंबीयांचा आधार हा सर्जा राजा असतो. अशा शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांना पालकमंत्री गुलाबराव पाटील दरवर्षी बैलपोळा निमित्त बैलांसाठीचा साज वाटप करून त्यांचा बैलपोळा गोड करत असतात. पालकमंत्री गुलाबराव पाटील व माजी जि.प सदस्य प्रतापराव गुलाबराव पाटील यांच्यातर्फे आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या कुटुंबियांना आधार म्हणून ज्यांच्याकडे बैलजोडी आहे त्यांच्या बैलांना पोळ्या निमित्त सजविण्यासाठी साज व ज्यांच्याकडे बैलजोडी नाही त्या कुटुंबाचा पोळा गोड व्हावा म्हणून महिन्याभराचा किराणा शिवसेना पदाधिकारी व गावातील कार्यकर्त्यांच्या मार्फत पोहोचविण्यात आला आहे.
या गावातील शेतकऱ्यांना केला बैलांसाठीचा साज वाटप !
शिवसेना पदाधिकारी व गावातील कार्यकर्त्यांनी धरणगाव तालुक्यातील नांदेड, धरणगाव, सोनवद बु, भोद बु, भवरखेडा, पिंपळेसिम व चिंचपुरा तसेच जळगाव तालुक्यातील जामोद, धानवड, लमांजन, म्हसावद, सुभाषवाडी, पाथरी, दापोरे, शिरसोली, कंडारी व गाढोदे या गावातील आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या वारसांना बैल पोळ्यानिमित्त साज वाटप केला तसेच यातीलच ज्या शेतकऱ्यांकडे बैल जोडी नाही त्यांना किराणा वाटप केला.