जळगाव (प्रतिनिधी) – जळगाव शहरातील रस्ते नवीन बनविण्यासाठी आणखी १०० कोटी रुपये दिले जातील. यासाठी शहराचे आ. राजूमामा भोळे यांचा प्रस्ताव आमच्याकडे आला आहे. त्याला आता आम्ही मंजुरी देत आहोत. तसेच, जळगावात नवीन एमआयडीसीची घोषणा करीत असून त्याद्वारे नवीन रोजगार निर्माण करण्याचा आमचा प्रयत्न राहणार आहे, असेही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जळगावात आल्यावर सांगितले.
जळगाव शहरात “माझी लाडकी बहीण” योजनेनिमित्त मेळावा सागर पार्कवर घेण्यात आला. त्यावेळी मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे, उप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, पालकमंत्री गुलाबराव पाटील, राज्याचे ग्रामविकास, पंचायतराज मंत्री गिरीश महाजन यांच्यासह लोकप्रतिनिधी उपस्थित होते. यावेळी मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, आ. राजूमामा उर्फ सुरेश भोळे यांनी शहराच्या रस्त्यांसाठी १०० कोटी रुपयांची मागणी केली होती. ज्या जिल्ह्याचे रस्ते चांगले त्यांची प्रगती वेगवान होते. त्यामुळे (अर्थमंत्री तथा उप मुख्यमंत्री अजितदादांकडे पाहून) आम्ही १०० कोटी रुपयाच्या प्रस्तावाला मंजुरी देत आहोत, असे ते म्हणाले.
तसेच, जळगावात नवीन एमआयडीसीची घोषणा करून उद्योगमंत्र्याना सांगून आम्ही भगिनींना रोजगार देण्याचा देखील प्रयत्न करणार आहोत, असे शिंदे म्हणाले. पारोळा नगरपालिकेचा पाणीपुरवठा योजनांबाबत आ. चिमणराव पाटील यांच्या प्रस्तावासाठी आम्ही जीआर काढलेला आहे अशीही माहिती त्यांनी दिली.