खानदेशात विधानसभेच्या २० जागा ‘मनसे’ लढणार ज्येष्ठ नेते अॅड. जयप्रकाश बाविस्कर यांची माहिती
जळगाव- लोकसभा निवडणुकीनंतर आता विधानसभेचे वेध सर्वच पक्षाचे पदाधिकारी, इच्छुकांना लागले आहेत. महाराष्ट्र नवनिर्माण सेना खानदेशात (जळगाव, धुळे, नंदुरबार) २० जागा स्वतंत्र लढेल. त्यादृष्टीने आम्ही तयारी सुरू केली आहे. ‘मनसे’चे अध्यक्ष राज ठाकरे स्वतः उमेदवार फायनल करतील, अशी माहिती ‘मनसे’चे ज्येष्ठ नेते अॅड. जयप्रकाश बाविस्कर यांनी ‘सकाळ’ला दिली.
खानदेशातील जळगाव जिल्ह्यातील विधानसभेच्या ११ जागा, धुळे येथील पाच, नंदुरबारच्या चार, अशा एकूण २० जागांवर ‘मनसे’चे उमेदवार स्वतंत्रपणे लढतील. प्रत्येक मतदारसंघात मी स्वतः जाऊन आलो आहे. पक्षाची बांधणी सुरू आहे. २० विधानसभा मतदारसंघात जेवढी गावे येतात, तेवढे शाखाध्यक्ष आगामी १५ दिवसांत नेमले जातील. सर्वच मतदारसंघांत मतदारांशी चर्चा, इच्छुकांशी चर्चा सुरू आहे. प्रत्येक मतदारसंघात मतदारांशी संपर्क सुरू आहे.
उमेदवाराची निवड व मुलाखती अध्यक्ष ठाकरे घेतील. जुलैच्या दुसऱ्या आठवड्यात ते दौऱ्यावर येणार आहेत.
महापालिकेचीही तयारी सुरू.. जळगाव व धुळे महापालिकेच्या निवडणुकीत ‘मनसे’ सर्वच जागा लढविणार आहे. महापालिकेच्या प्रत्येक वार्डनिहाय पक्ष बांधणी सुरू आहे. ‘महायुती’ला श्री. ठाकरे यांनी पाठिंबा दिल्यानंतर जळगाव व रावेर लोकसभेत मनसे सैनिकांनी भाजपच्या उमेदवारांना निवडून आणण्यासाठी प्रयत्न केले. सिंहाचा नाही, मात्र खारीचा वाटा भाजपच्या दोन्ही उमेदवारांच्या विजयात आहे. तिन्ही जिल्ह्यातील विधानसभेच्या मतदारसंघात अनेक इच्छुक आहेत. सक्षम उमेदवार आमच्याकडे आहेत. राजकीय पाठबळ नसलेले मात्र सामाजिक कार्यात अग्रेसर असलेले, प्रतिष्ठीत उमेदवारही आमच्या संपर्कात आहेत, असे अॅड. बाविस्कर यांनी सांगितले.