जळगाव (प्रतिनिधी) – जिल्ह्यातील शासकीय सर्व शाळेतील मुलांमध्ये राष्ट्रभक्ती निर्माण व्हावी, भारतीय संस्कृतीची त्यांना माहिती व्हावी, चांगले संस्कार निर्माण व्हावेत यासाठी नियमित राष्ट्रगीत, प्रार्थना, प्रतिज्ञा होत असते. याच धर्तीवर राज्य सरकारने आता जय जय महाराष्ट्र माझा गीताचा समावेश केला आहे. हे राज्य गीत सर्वच शाळांमध्ये गायले किंवा म्हटले जाणे बंधनकारक असल्याचे राज्य सरकारने म्हटले आहे.
जळगाव जिल्ह्यातील सर्व शाळांमध्ये महाराष्ट्राचे राज्य गीत जय जय महाराष्ट्र माझा हे म्हटले जाणे बंधनकारक असून, सर्व शाळांना राज्य गीत नियमित म्हणण्यासाठी निर्देश दिले आहेत. ज्या शाळेत राज्य गीत म्हटले जाणार नाही, याबाबत तक्रार आल्यास त्या शाळेवर कारवाई होईल. कल्पना चव्हाण माध्यमिक शिक्षणाधिकारी जि. प. जळगाव
जय जय महाराष्ट्र माझा हे राज्य गीत आता राज्यातील प्रत्येक शाळेमध्ये नियमित म्हटले जाणार आहे. या गीताच्या माध्यमातून बालपणीच विद्यार्थ्यांना महाराष्ट्राचे गौरवगाथा समजणार आहे. सर्व माध्यमांच्या आणि सर्व व्यवस्थापनांच्या प्रत्येक शाळेत दररोजचे वर्ग सुरू होताना राष्ट्रगीत, प्रार्थनेसोबत राज्यघट वाजवले/ गायले जाईल, याची दक्षता शाळा व्यवस्थापनांनी घ्यायची आहे. या सूचनेचे पालन होत आहे ना याची दक्षता सर्व विभागीय शालेय शिक्षण उपसंचालकांनी घ्यायची आहे, असे पत्र राज्य शासनाने काढले आहे.
जय जय महाराष्ट्र माझा या गीतास राज्यात गीताचा दर्जा महाराष्ट्र राज्य सरकारने दिला. वर्षभरापूर्वी हे गीत राज्य गीत झाले. त्यानंतर या गीताला त्याचा उचित सन्मान मिळत नव्हता. कोणत्याही शैक्षणिक संस्थेत महाराष्ट्राचे राज्य गीत गायले जात नव्हते. त्यानुसार राज्य सरकारच्या शिक्षण विभागाने नुकतेच शासन निर्णय जारी करून सर्व शाळांमध्ये राज्य गीत म्हटले जाणे बंधनकारक केले आहे.