जळगाव (प्रतिनिधी) – समाज कल्याण विभागाच्या वतीने अमळनेर येथे उभारण्यात आलेल्या १०० विद्यार्थी क्षमतेच्या मागासवर्गीय मुलींच्या शासकीय वसतीगृह इमारतीचे उद्घाटन राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते ४ फेब्रुवारी २०२४ रोजी होत आहे. दुपारी २:३० वाजता संपन्न होणार या कार्यक्रमास उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार, ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन, पालकमंत्री गुलाबराव पाटील ,आपत्ती व्यवस्थापन व मदत पुनर्वसन मंत्री अनिल पाटील यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे.
सामाजिक न्याय विभागाचे सचिव सुमंत भांगे, विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे, समाज कल्याण आयुक्त ओम प्रकाश बकोरिया, जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, मुख्य कार्यकारी अंकित , मुख्य अभियंता सार्वजनिक बांधकाम प्रशांत औटी, समाज कल्याण नाशिक विभागाचे प्रादेशिक उपायुक्त माधव वाघ, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिक्षक अभियंता प्रशांत सोनवणे आदी मान्यवर उपस्थित राहणार असल्याची माहिती योगेश पाटील, सहायक आयुक्त, समाज कल्याण व श्री प्रांजल पाटील, कार्यकारी अभियंता, सा.बा.विभाग यांनी दिली आहे..
सदर १०० विद्यार्थी क्षमतेच्या वसतिगृहास सन २००७ मध्ये मान्यता देण्यात आलेली असुन सद्यस्थितीत हे भाडेतत्त्वावर कार्यान्वित होते. सन २०१४ मध्ये अमळनेर येथील गट नंबर ३९३ मध्ये ०. ८० आर जागा उपलब्ध झाल्याने येथे शासन निर्णय दिनांक १३/०३/२०१३ नुसार रुपये ८ कोटी ५५ लाख इतक्या रकमेच्या प्रशासकीय खर्चास मान्यता मिळाली होती. त्यानुसार इमारत पूर्ण झालेली असून मुलींकरिता 27 स्वतंत्र खोल्या तयार करण्यात आले आहेत. तसेच प्रत्येक खोलीत सौर ऊर्जा संचालित गरम पाण्याची सोय करण्यात आली आहे.
स्वतंत्र अभ्यासिका ची खोली असून सौर ऊर्जा संचालित विद्युतीकरण करण्यात आले आहे. तसेच ६ हजार चौरस फुटाचे भव्य कोर्टयार्ड तयार करण्यात आले असून अपंग विद्यार्थिनींसाठी स्वतंत्र खोल्या तयार करण्यात आले आहेत. त्याचबरोबर स्वतंत्र भोजन कक्ष व स्टोर रूम असून गृहपाल यांना राहण्याची व्यवस्था स्वतंत्रपणे करण्यात आली आहे.